आज नौदल दिन. १९७१ मध्ये ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलानं चार पाकिस्तानी जहाजं बुडवली होती आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले होते. भारतीय नौदलाची ही कामगिरी आणि शौर्याचा आदर करण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. भारतीय नौदलाचे शूर जवान अतुलनीय धैर्यानं आणि समर्पणानं देशाच्या समुद्राचं रक्षण करतात त्यांचा आणि नौदलाच्या समृद्ध सागरी इतिहासाचा अभिमान आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून नौदलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नौदल हे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि सागरी सुरक्षेचा मजबूत आधारस्तंभ आहे, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नौदल दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
२४ व्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदल आज ओडिशा इथल्या पुरी इथल्या ‘ब्ल्यू फ्लॅग बीचवर’ ऑपेरेशनल प्रात्यक्षिकाद्वारे त्यांचं सामर्थ्य आणि पराक्रमाचं सादरीकरण करेल. या कार्यक्रमाला सर्वोच्च सशस्त्र दलाच्या कमांडर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच ओडिशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, लष्करी मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.