दावोस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणूकदार परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं, हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन, रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली, रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांची फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५ हजार मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.