पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा आज होत असून, भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिसमधल्या सीन नदीच्या किनाऱ्यावर या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियम बाहेर उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी सीन नदीमध्ये १० हजार खेळाडूंना घेऊन १०० नौका परेड मध्ये सहभागी होतील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांच्या खेळाडूंचा समावेश असलेली परेड पॅरिस मधल्या काही महत्वाच्या स्थळांवरून पुढे जाईल. तीन तासांचा हा कार्यक्रम जगाला पॅरिसचा इतिहास आणि स्थापत्यकलेचा प्रवास घडवेल. परेड मध्ये भारताचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि टेबल टेनिस पटू शरथ कमल करणार आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतानं काल शानदार सुरुवात केली असून, नेमबाजीमध्ये रँकिंग फेरीत भारतीय पुरुष संघानं तिसरं स्थान, तर महिला संघानं चौथं स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं.
उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा सामना यजमान फ्रान्स आणि नेदरलँड्स यांच्यातल्या अंतीम -16 सामान्यातल्या विजयी संघाबरोबर होईल. तर भारतीय पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीत कोलंबिया किंवा तुर्की बरोबर खेळेल. मिश्र सांघिक स्पर्धेत भारताचा सामना इंडोनेशियाशी होणार आहे. २८ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान या स्पर्धा होतील. उद्या होणाऱ्या 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक आणि 10 मीटर एअर पिस्टल पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ सहभागी होणार आहे.