महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज संध्याकाळी साडे सहा वाजता राजभवनात होणार आहे. सी. पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते. काल मावळते राज्यपाल रमेश बैस यांना राजभवनात आयोजित समारंभात निरोप देण्यात आला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २८ जुलै रोजी विविध राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती केली होती. त्यापैकी काही राज्यपालांनी शपथ घेतली असून काहींचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी होणार आहे.
लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आज मणिपूरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. आज सकाळी इंफाळ येथील राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. तर गुलाबचंद कटारिया यांनी आज पंजाबचे राज्यपाल आणि चंदिगडचे प्रशासक म्हणून शपथ घेतली. आज सकाळी पंजाबच्या राजभवनात हा सोहळा झाला. माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी देखील आज सकाळी झारखंडचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज त्यांची औपचारिक भेट घेतली. आज संध्याकाळी हरिभाऊ बागडे यांचा राज्यपाल पदाचा शपथविधी होणार आहे.