मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं दुखापतीमुळे अचानक माघार घेतली.
नोवाक जोकोविच आणि जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला सेट ७-६ असा गमावल्यावर नोवाक जोकोविचनं स्पर्धेतून मध्येच माघार घेतली. स्पेनच्या कार्लोस अल्काराझसोबत झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविचच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. नोवाक जोकोविचनं या स्पर्धेचं विजेतेपद सर्वाधिक १० वेळा जिंकलं आहे.
जोकोविचनं माघार घेतल्यामुळे अलेक्झांडर झ्वेरेव अंतिम फेरीत दाखल झाला आहे. झ्वेरेव्हला आता आपलं पाहिलं ग्रँड स्लॅम पदक जिंकण्याची संधी मिळाली असून त्याचा सामना इटलीचा टेनिसपटू यानिक सिन्नर किंवा अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यातल्या विजेत्याशी होणार आहे. अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.
महिला एकेरीच्या अंतिम सामना उद्या होणार असून जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली आरीना सबालेन्काचा सामना अमेरिकेच्या एकोणिसाव्या मानांकित मॅडिसन कीज सोबत होणार आहे.