विख्यात टेनिसपटू, २४ वेळा ग्रँडस्लॅम पदकविजेता नोव्हाक ज्योकोविच यानं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिस एकेरीचं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच करिअर गोल्डन स्लॅम, अर्थात आपल्या कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि शिवाय ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावणाऱ्या काही मोजक्या टेनिसपटूंच्या यादीत नोव्हाक ज्योकोविचच्या नावाची भर पडली. या उमद्या खेळाडूविषयी..
१४ जुलै २०२४. विम्बल्डनच्या अतिशय प्रतिष्ठित सेंटर कोर्टवर एकदोनदा नव्हे, तर दहा वेळा अजिंक्यपदासाठी लढत दिलेला आणि सात वेळा विम्बल्डनची देखणी ट्रॉफी उंचावलेला, गोट अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम नोव्हाक ज्योकोविच यंदा सरळ सेट्समध्ये हरला. रॉजर फेडररच्या डाय हार्ड चाहत्यांना कदाचित थोडा आनंदच झाला, कारण नोव्हाक जिंकला असता, तर त्यानं पुरुष एकेरीत सगळ्यात जास्त, आठ विम्बल्डन जेतेपदांच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली असती. पण, ही हार अतिशय ग्रेसफुली स्वीकारून नोव्हाक बोलायला उभा राहिला आणि त्यानं सुरुवात केली, तीच मुळी त्याचा प्रतिस्पर्धी, अजिंक्यपद विजेता कार्लोस अल्काराजच्या उत्तम खेळाचं, त्याच्या टीमचं भरभरून कौतुक करून. प्रेक्षकही त्याला हसून, टाळ्या वाजवून मनसोक्त दाद देत होते. त्याच्या टीमबद्दल, कुटुंबाबद्दल त्याचं बोलणं अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारं होतं.
महिन्याभरापूर्वी गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये असलेला हा ३७ वर्षांचा टेनिसपटू विम्बल्डनमध्ये उतरतो, चौथ्या फेरीच्या सामन्यात त्याचा अपमान करणाऱ्या प्रेक्षकांना ‘गूSSSSSSSSड नाइट’ म्हणून त्यांची जागा दाखवत स्वतःसाठी ठामपणे उभा राहतो, भूमिका घेतो, दुसऱ्या एका सामन्यात व्हायोलिन शिकणाऱ्या त्याच्या लहानग्या मुलीसाठी रॅकेटचं व्हायोलिन वाजवतो, अंतिम फेरीतला पराभवही खिलाडूवृत्तीने स्वीकारतो आणि जेमतेम वीस दिवसांनी पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात विम्बल्डनमध्ये त्याला सरळ सेट्समध्ये हरवलेल्या कार्लोस अल्काराजवर सरळ सेट्समध्ये मात करून सुवर्णपदक जिंकण्याचं आपलं स्वप्न साकार करतो. ‘बिग थ्री’, अर्थात नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यात संख्यात्मक तुलना करायची झाली, तर सगळ्यात जास्त, २४ ग्रँडस्लॅम अजिंक्यपदं पटकावून ‘गोट’ ठरलेला नोव्हाक करिअर गोल्डन स्लॅमचा मैलाचा दगडही गाठतो. किती विलक्षण आहे हा सगळा प्रवास!
श्रोतेहो, २२ मे १९८७ रोजी तत्कालीन युगोस्लाव्हियामध्ये जन्मलेल्या नोव्हाक ज्योकोविचनं वयाच्या चौथ्या वर्षी टेनिसची रॅकेट पहिल्यांदा हातात धरली. विख्यात टेनिस कोच येलेना जेन्सिक यांच्या उन्हाळी ट्रेनिंग कॅम्पला तो रोज जायचा आणि बघत राहायचा. एक दिवस येलेना यांनी त्याला कोर्टवर बोलावलं. तो गेला आणि टेनिस खेळायला लागला. तशी त्याला स्कीइंगची, फुटबॉलचीही आवड होती, पण त्याचं प्रेम जडलं ते टेनिसवर. आणि अर्थात, ज्याच्या खेळानं त्याला वेड लावलं, त्या पीट सॅम्प्रसवर. शाळा सुटल्यानंतर इतर मुलांसोबत खेळण्याऐवजी नोव्हाकला गडबड असायची ती घरी येऊन टेनिसच्या प्रॅक्टिसला पळायची. त्याचा खेळ बघून येलेना जेन्सिक इतक्या भारावून गेल्या, की त्यांनी नोव्हाकच्या आईवडिलांना सांगितलं, ‘त्याची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्याला देशाबाहेर पाठवण्याशिवाय पर्याय नाही.’ त्याचे आई-बाबा छोटंसं रेस्टॉरंट चालवायचे. नोव्हाकसह त्याच्या दोन धाकट्या भावंडांचं शिक्षण आणि टेनिसच्या ट्रेनिंगसाठी त्यांना जास्त व्याजदराने कर्ज काढावं लागलं.
१९९९मध्ये त्या भागातली आर्थिक, राजकीय परिस्थिती बिघडत होती. याच दरम्यान नाटोनं युगोस्लाव्हियावर बॉम्बचा वर्षाव केला. जोकोविच तेव्हा १२ वर्षांचा होता. बेलग्रेड इथं तो राहायचा. ज्या ज्या रात्री बॉम्ब पडायचे, त्या त्या रात्री त्यांच्या घरापासून ५०० फुटांवरच्या त्यांच्या आजोबांच्या अपार्टमेंटमध्ये ते यायचे, कारण त्यांच्या इमारतीत बॉम्ब शेल्टर नव्हतं. या युद्धाचा, त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सगळ्यांच्याच मनावर, विशेषतः लहान मुलांवर खूप खोल परिणाम झाल्याचं ज्योकोविचनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. बॉम्बफेक सुरू झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या रात्री सगळे झोपायच्या तयारीत असताना एक मोठा स्फोट झाला. त्याची आई चटकन उठायला गेली आणि तिचं डोकं कुठल्यातरी वस्तूला इतक्या जोरात आपटलं, की ती बेशुद्ध झाली. मुलं घाबरून रडायला लागली, बॉम्ब्सना, आईला काय झालं या काळजीने. सुदैवाने त्याच्या वडिलांनी आईला शुद्धीवर आणलं. पण, याच मुलाखतीत तो सांगतो, की महिन्याभराने या गोष्टींचा फरक पडणंच बंद झालं. याबाबतची त्यानं सांगितलेली आठवण अंगावर काटा आणणारी आहे. ज्या टेनिस क्लबमध्ये तो लहानाचा मोठा झाला, तिथं त्याचा १२वा वाढदिवस साजरा होत होता आणि वाढदिवसाचं गाणं सुरू असताना वरून एक विमान जात होतं…
ज्योकोविच सांगतो की मोठा होत असताना त्याच्या मनात या सगळ्यामुळे खूप राग भरलेला असायचा. पण याच रागाचा फायदा या उमद्या सर्बियन टेनिसपटूला त्याला टेनिसमधली झळझळती कारकीर्द सुरू करताना झाला. वयाच्या १४व्या वर्षी त्यानं युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी, दुहेरी आणि सांगिक प्रकारात अजिंक्यपद पटकावलं, जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आणि यानंतरचा त्याचा प्रवास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आजघडीला २४ ग्रँडस्लॅम अजिंक्यपदं, ७ एटीपी फायनल्स, ४० एटीपी मास्टर्स वन थाऊजंड आणि १ ऑलिम्पिक सुवर्णपदक अशी एकंदर ७२ अजिंक्यपदं नोव्हाक ज्योकोविचच्या नावावर आहेत.
या सगळ्या प्रवासात अनेक वादंग, अडचणीचे प्रसंगही ज्योकोविचचा पाठलाग करत आले. २०२०च्या यूएस ओपनमध्ये १६ टेनिसपटूंच्या फेरीत त्यानं मारलेला बॉल चुकून लाइन अंपायरच्या गळ्यावर बसला आणि यासाठी त्याला स्पर्धेतून बाहेर काढलं गेलं. या निर्णयानंतर ज्योकोविच लगेचच मैदानातून बाहेर पडला आणि निघून गेला. त्याच्या या निर्णयावरही टीका झाली. कोरोनाची लस घ्यायला त्यानं स्पष्ट नकार दिल्यानं ऑस्ट्रेलिया सरकारनं त्याला २०२२च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची परवानगी दिली नाही. इतकंच काय, तर त्याला ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतावं लागलं. गेल्या वर्षीच्या रोलंड गॅरोस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा सामना जिंकल्यानंतर त्यानं कोसोव्होतल्या परिस्थितीबद्दलची त्याची राजकीय भूमिका कॅमेऱ्यावर लिहिली. यावरूनही वादंग झालं.
मध्येमध्ये प्रेक्षकांनी हुर्यो उडवणं, अपमानजनक टिप्पण्या करणं, उत्तम खेळूनही दाद न देणं अशा गोष्टींचाही सामना त्याला करावा लागला आणि आजही करावा लागतो. आणि या सगळ्याकडे कधी दुर्लक्ष करत, कधी त्याला शिंगावर घेत, कधी जोरदार प्रत्युत्तर देत नोव्हाक ज्योकोविच उभा आहे. आता तर, करिअर गोल्डन स्लॅम पूर्ण केल्यामुळे आणखी एक मानाचा तुरा त्याच्या शिरपेचात खोवला गेला आहे. १५ दिवसांनी म्हणजे लगेचच सुरू होणाऱ्या यूएस ओपनच्या मैदानात तो डिफेन्डिंग चॅम्पियन म्हणून उतरणार आहे. विम्बल्डन जेतेपदांची पंचविशी गाठण्याची संधी त्याला आहे. काहीजणांसाठी तो गोट आहे, तर काही जणांसाठी उद्धट. पण, नोव्हाक ज्योकोविचचा सध्याचा फॉर्म पाहता एकच म्हणता येईल, ;You can love Novak Djokovic, you can hate Novak Djokovic, but you can’t, simple can’t ignore Novak Djokovic!’