राज्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चित्र आज स्पष्ट झालं. यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सुमारे ४ हजार १०० उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सुमारे ३ हजार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी बंडखोरी पूर्णपणे शमलेली नाही. गेल्या विधानसभा निवडणूक ३ हजार २७५ उमेदवार रिंगणात होते.
जागावाटपाबद्दल शेतकरी कामगार पक्षाशी चर्चा झाली असून उरणची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवेल, तर अलिबाग, पेण आणि पनवेलमधून शेकापचे उमेदवार निवडणुकीत उतरतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी पाठवली नसल्यामुळे माघार घेत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागं घेतला. राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र लाटकर माघार घ्यायला तयार झाले नसल्यानं शेवटच्या १० मिनिटात मधुरिमाराजे यांनीच अर्ज मागे घेतला.
माघार घेणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उदय बने, मोहोळमधले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिद्धी कदम आणि रमेश कदम यांची नावं आहे.
नाशिक जिल्ह्यातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपाचे बंडखोर नेते शशिकांत जाधव आणि दिलीप भोसले, शिवसेनेचे धनराज महाले यांनी अर्ज आज मागे घेतले. नागपूर ग्रामीणच्या उमरेड मतदारसंघातून माजी आमदार राजू पारवे यांनी आपला अर्ज मागे घेतला.
माहिम विधानसभा मतदार संघात मनसेचे अमित ठाकरे यांना महायुतीचा पाठिंबा देण्याची भूमिका भाजपानं घेतली होती. मात्र तिथून शिवसेनेचे सदा सरवणकर निवडणूक रिंगणात कायम आहेत.
नाशिक जिल्ह्यात समीर भुजबळ, निर्मला गावित यांची उमेदवारी कायम आहे. राजापूरमधून काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.