कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलं. महाराष्ट्रात पिकविमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री शिवाजीराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितलं. याबाबत सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बोलत होते.
महाराष्ट्र सरकारने पिकविमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत, असंही चौहान म्हणाले.
पिकविमा योजना ही जगातली सर्वात मोठी विमा योजना आहे, काही राज्यांची त्यांची स्वतःची विमा योजना आहे, असं चौहाना दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. सर्व प्रकारच्या नैसर्गिक संकटामुळे निर्माण होणाऱ्या जखमीपासून संरक्षण करणं हा या योजनेचा हेतू आहे, असं ते म्हणाले.
देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. सरकारने २०१९ पासून उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा गृहित धरून किमान हमीभाव ठरवले आहेत, असं चौहान म्हणाले. नारळ उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनल्याचा उल्लेखही यावेळी चौहान यांनी केला.