नीती आयोग ४ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान संपूर्णता अभियान राबवणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी या आकांक्षित तालुक्यात आज नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं.
आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी दिल्या. या क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि एएनएम यांच्या कामाचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थितांनी आकांक्षित तालुक्याला सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा केली.