केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातल्या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत सर्वसाधारण गटात पहिला क्रमांक आयआयटी मद्रासने पटकावला असून आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरा क्रमांक बंगळुरूच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स ला मिळाला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही क्रमवारी जाहीर करताना सांगितलं की यंदापासून कौशल्य विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ आणि राज्यसरकारी विद्यापीठ अशा आणखी तीन गटातही शैक्षणिक संस्थांना मानांकन मिळणार आहे. एकूण १६ गटांमधे ही मानांकनं देण्यात आली असून सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातल्या १० संस्थांचा समावेश आहे. अभियांत्रिकी गटात आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय शिक्षण गटात डी वाय पाटील विद्यापीठ ११व्या क्रमांकावर आहे तर कायद्याचं शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या गटात पुण्याचं सिम्बायोसिस लॉ स्कूल पाचव्या क्रमांकावर आहे.