जम्मू आणि काश्मीरमधील अमली पदार्थांच्या वापर करुन दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटातील प्रमुख फरार आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA नं काल अटक केली. सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी उर्फ सलीम अंद्राबी जून 2020 पासून फरार होता. या अटकेमुळे नार्को-दहशतवाद संबंध नष्ट करण्याच्या आणि भारतात अमली पदार्थांचा वापर करुन दहशतवादी गटाला बळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या परिसंस्थेला उद्ध्वस्त करण्याच्या सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं असल्याचं NIA नं म्हटलं आहे.
जम्मू आणि काश्मिर तसंच देशभरांत अमली पदार्थांची विक्री करुन निधी उभारणी करण्याचं काम तो करत होता. पाकिस्तान सीमेवर बंदी असलेल्या लष्कर ए तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी जवळीक साधून अमली पदार्थ तस्करांच्या मदतीनं असे पदार्थ भारतात विक्री करुन त्या पैशातून दहशतवादी कारवायांना बळ देण्यासाठीचा हा कट होता. असं तपासात निष्पन्न झालं आहे.