न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या. आता न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी आहे. भारताच्या कुलदीप यादव, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर आज झालेल्या या सामन्यात फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ अवघ्या ४६ धावांमध्ये गारद झाला. कोहलीसह भारताचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. रिषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ गडी बाद केले. विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ भारतीय खेळाडूंना तंबूत परत पाठवलं. हा या सामन्याचा दुसरा दिवस होता, कालच्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला होता.
जागतिक कसोटी क्रमवारी भारत सध्या सर्वोच्च स्थानावर असून न्यूझीलंड सहाव्या स्थानी आहे. यापूर्वी बांग्लादेशासोबत खेळलेली मालिका भारतानं २-० अशी जिंकली होती. तर न्यूझीलंडनं श्रीलंकेविरोधातली मालिका ०-२ अशी गमावली आहे.