डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 1, 2025 3:54 PM | New Year 2025

printer

जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत

देशासह जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या दैदिप्यमान, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकजुटीनं कार्य करण्याच्या वचनबद्धतेला आपण पुन्हा एकदा उजाळा देऊ या, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संविधानकर्त्यांच्या स्वप्नांना साकार करत २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य करण्याची हीच वेळ असल्याची आठवण उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात करुन दिली आहे. तर नवीन वर्षात सर्व देशवासीयांना उत्तम आरोग्य, समृद्धी, नवनवीन संधी, यश आणि आनंद मिळो, अशी शुभकामना प्रधानमंत्र्यांनी केली आहे.

 

सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहूया असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असा संकल्प केला आहे. कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानानं महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ‘विकसित भारत’ आणि ‘प्रगतीशील महाराष्ट्र’ घडवण्यासाठी प्रयत्न करू असा संकल्प करून जनतेच्या सुखसमृध्दीसाठी राज्य सरकार काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 

तर नवीन वर्ष जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं आणि महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. श्रोते हो, २०२४ या वर्षभरात आर्थिक क्षेत्रात घडलेल्या घडामोडींचा आढावा आज आपण ‘सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. रात्री सव्वा ७ वाजता अस्मिता वाहिनीसह, news on air हे ॲप आणि समाजमाध्यमांवर आपल्याला हा कार्यक्रम ऐकता येईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा