२०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातले नागरिक सज्ज झाले आहेत. नाताळ आणि त्याला लागून आलेल्या सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटक विविध पर्यटन स्थळांवर दाखल झालेत. नववर्षानिमित्त ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. हॉटेल, समुद्र किनारे, चौपाट्या, पब, डिस्कोथेक अशा विविध ठिकाणांवर नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत १५ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मद्यपान करून गाड्या चालवणाऱ्यांविरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत. मुंबई तसंच ठाणे भागातल्या निर्जन जागांवर पोलिसांच्या ड्रोनची गस्त असणार आहे. पोलिसांनी समुद्र किनाऱ्यांवरच्या गस्तीतही वाढ केली असून वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केला आहे. नववर्षाचं स्वागत आटोपून घरी परतणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या आणि बेस्ट बसेस सोडण्यात येणार आहेत.
पालघर जिल्ह्यातल्या केळवा, चिंचणी, डहाणू, बोर्डी, घोलवड, सफाळा, वसई, अर्नाळा या समुद्र किनाऱ्यांसह इतर ठिकाणीही कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. भंडारदरा धरणाचा परिसर, घाटघर, रतनवाडी व्हॅलीतही पर्यटकांनी गर्दी केलीय. नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यासह इतरत्रही पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. पुण्यात पार्ट्यांवरही पोलीसांचं विशेष लक्ष आहे. नाशिक शहरातही ६५ ठिकाणांवर ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात नाकाबंदी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी, फिरस्ती पथकही तैनात करण्यात आली आहेत.