आज 31 डिसेंबर- सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. देशभरात विविध पर्यटन स्थळं गर्दीने फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख इथं हिमवृष्टीचा आनंद घेत नववर्षाचं स्वागत करता यावं याकरता आतिथ्य उद्योगाने वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. हॉटेल आणि उपाहार गृहं, मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बसमार्गांवर रात्री 25 जादा बसगाड्या सोडणार आहे. तसंच नागरिकांना दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक तसंच प्रेक्षणीय स्थळांचा फेरफटका नवीन वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसद्वारे घडवण्याच्या हेतूनं बेस्टतर्फे आज हेरिटेज टूर चालवण्यात येणार आहेत.
नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात 3 हजार पोलीस-अधिकारी कर्मचारी आणि 700 वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात 23 ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी आहे. या संबंधीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.