नवी दिल्ली स्थानकावरच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेची समिती स्थापन
नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री चेंगराचेंगरी होऊन किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांची समिती रेल्वेनं नेमली आहे. या समितीनं स्थानकावरचे सीसीटीव्ही फूटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत.
प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी अचानक अलोट गर्दी झाली होती. फलाट क्रमांक १४ आणि १५ वर उतरण्यासाठी असलेल्या पुलावरुन उतरताना काहीजण घसरले त्यामुळे गर्दीतली माणसं एकमेकांवर कोसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचं उत्तर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली स्थानकावर परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नवी दिल्ली स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी दिल्लीहून प्रयागराजला जाण्यासाठी तात्काळ चार गाड्या सोडल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही अश्विनी वैष्णव तसंच दिल्लीच्या नायब राज्यपालांशी चर्चा केली. जखमींना तत्काळ आवश्यक ती मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या प्रियजनांचं त्यांनी सांत्वन केलं असून जखमी झालेल्यांना लौकर बरं वाटावं, अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबद्दल तीव्र शोकभावना प्रकट केली आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेची बातमी दुःखद आणि वेदनादायक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महाकुंभातून आणलेल्या गंगाजलाचा लाभ घेण्यासाठी नागपूरमधे आयोजित कार्यक्रमानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.