कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होणं आवश्यक आहे. त्यामुळं एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. नवीन फौजदारी कायद्यांच्या राज्यातल्या अंमलबजावणीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये तीन नवीन गुन्हेगारी कायदे लवकरात लवकर लागू करावे. नव्या कायद्यानुसार खटले चालवण्यासाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करावी, अशा सूचना अमित शाह यांनी केल्या. संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवावी. तसंच, कारागृहं, सरकारी रुग्णालयं, बँका आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरावे नोंदवण्याची प्रणाली विकसित करावी, असे आदेशही या बैठकीत शहा यांनी दिले.
राज्यात तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असून, ९० टक्के पोलिस दलानं नवीन कायद्यांचं प्रशिक्षण घेतलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेनं होकार दिला असून, त्याच्या विरोधात मुंबईत खटला चालवण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.