नेपाळमध्ये गेल्या १३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या भक्तपूर महोत्सवाला गेल्या पाच दिवसांत लाखो लोकांनी भेट दिली. त्यामुळे इथं प्रचंड गर्दी झाली होती. भक्तपूरच्या अद्वितीय आणि ऐतिहासिक कला, संस्कृती, उत्सव आणि जीवनशैलीची जगाला ओळख करून देणं हा महोत्सवाचा उद्देश होता. भक्तपूर हा काठमांडू खोऱ्यातील एक जिल्हा असून त्याच्या परिसरात भक्तपूर दरबार स्क्वेअर आणि चांगू नारायण मंदिर ही यूनेसकोची वारसा स्थळे आहेत. भक्तपूर दरबार चौकात पौभा चित्रकला प्रदर्शन आणि कांस्य, दगड आणि लाकडातील पारंपरिक शिल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. सांस्कृतिक नृत्य सादरीकरणाच्या व्यासपीठावर पर्यटकांनी गर्दी केली होती. तिथं कलाकारांनी बाराही नृत्य आणि लाखी नृत्य सादर केले. विविध शाळांमधील संगीत बँड तसेच स्थानिक समुदाय गटांनी बासरी आणि पारंपारिक वाद्ये वाजवत वेगवेगळ्या रस्त्यांवर मिरवणुका काढल्या होत्या. स्थानिक लोकांनी बनवलेल्या हस्तकला वस्तू प्रदर्शनासह विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. कुंभार चौकात भक्तपुरातील समाज वापरत असलेल्या पारंपरिक मातीच्या भांड्यांचे प्रदर्शन भरवले होते. वनस्पती प्रेमींसाठी विविध प्रकारच्या शोभेच्या, फुलांच्या आणि फळझाडांच्या विक्रीसाठी व्यवस्था करण्यात आली होती.
Site Admin | December 18, 2024 10:44 AM | Bhaktapur Mahotsav | Nepal