77 व्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित दक्षिण विभागाच्या सन्मान सोहोळ्यात, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते विविध पदकं देऊन, लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसंच या दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल घेण्यात आली. पंधरा जानेवारीला होणाऱ्या लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराचा वाद्यवृंद प्रथमच सहभागी होणार आहे.
लष्कर दिन सोहळ्यात 7 वाद्यवृंद सहभागी होणार असून नेपाळ लष्कर वाद्यवृंद चाही यामध्ये समावेश आहे. भारतीय लष्कर दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नेपाळ लष्करी वाद्यवृंद पुण्यात दाखल झाला आहे. 33 जणांच्या या वाद्यवृंद मध्ये 3 महिला संगीतकारांचा समावेश आहे. दोन्ही देशातील ऐतिहासिक लष्करी संबंधांचा भाग म्हणजे भारतीय लष्करातील गोरखा रेजिमेंट.भारतीय आणि नेपाळ लष्करा तर्फे दोन्ही देशांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल पद बहाल करून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.
नोव्हेंबर महिन्यात भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना नेपाळ लष्कर तर्फे मानद जनरल पद बहाल करून गौरवण्यात आलं, तर डिसेंबर महिन्यात नेपाळ लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिगडल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मानद जनरल पद बहाल करून सन्मानित करण्यात आलं. दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंधांचा भाग म्हणून नेपाळ लष्करी वाद्यवृंद भारतीय लष्कर दिन सोहळ्यात सहभागी होणार आहे.