नक्षलवादाने कोणाचंही भलं झालेलं नाही. नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली, त्यानंतर ते बोलत होते. नक्षलवादी कारवायांविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्व घटकांकडून सहकार्य मिळाल्यास मार्च २०२६ पर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगण, ओडीशा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बैठकीत उपस्थित होते. नक्षली कारवायांची संख्या १६ हजारावरुन सात हजार सातशेवर उतरली असून नक्षली हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होण्याच्या घटनांमधे ७० टक्के घट झाली आहे, असं शाह म्हणाले.
चालू वर्षात २०२ नक्षली अतिरेकी सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकींमधे मारले गेले तर ८१२ अतिरेक्यांना अटक झाली. या वर्षात ८१२ नक्षल्यांनी शरणागती पत्करली असून नक्षलप्रभावित जिल्ह्यांची संख्या आता ३८ वर उतरली आहे. अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.