केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत एनपीएस वात्सल्य योजनेचा शुभारंभ केला.या योजनेद्वारे, अल्पवयीन मुलांना 18 वर्षे वयापर्यंत पैसे बचतीपासून उच्च परतावा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.या योजनेत चक्रवाढीद्वारे दीर्घकालीन आर्थिक लाभ सुनिश्चित करण्यात आला असून गुंतवणूकीचे पर्यायदेखील देण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
या योजनेच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नांदेड आणि नागपूर या चार जिल्ह्यांमधील लाभार्थी आणि बँक अधिकारी दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाले होते. तर मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरात एनपीएस वात्सल्य योजनेच्या लोकार्पण सोहोळ्यात काही मुलांना या योजनेसाठी आवश्यक असलेल्या प्राण अर्थात कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक कार्डचं वाटप करण्यात आलं.