नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना करण्यासाठी २ हजार ७६६ कोटी रुपये खर्चाच्या एकूण १ हजार ९५० कामांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दरड – वीज कोसळणे, पूर, यापासून संरक्षणासाठी भिंत, पुलांचं बांधकाम, नाला खोलीकरण, या कामांचा यात समावेश आहे. मंत्रालयातलं राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी कक्ष या केंद्राशी जोडले जातील. तसंच प्रत्येक जिल्ह्यातल्या आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचं अद्ययावतीकरण करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी आज मंजूर झाला.
राज्य भूस्खलन व्यवस्थापन आराखडा, ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन आराखडा, महाराष्ट्र राज्य उष्णतेची लाट कृती आराखडा या आपत्ती विषयक आराखड्यांना तसंच पालघर-वसई भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला यावेळी मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.