नाटो संघटनेच्या सदस्य देशांनी संरक्षणावर खर्च होणारी रक्कम आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी म्हणजे जीडीपीपैकी पाच टक्क्यांपर्यंत वाढवावी असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे. जागतिक संरक्षण खर्चाचा अनावश्यक भार अमेरिकेवर पडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ट्रंप दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत बोलत होते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन केल्यास कर कमी केले जातील, असाही प्रस्ताव ट्रंप यांनी मांडला.
कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन केलं नाही तर जास्त कर लादले जातील, असंही ते म्हणाले. सौदी अरेबिया आणि तेल उत्पादक संघटनेच्या देशांनी कच्च्या तेलाच्या किंमती कमी कराव्यात असंही आवाहन त्यांनी केलं. यामुळे रशिया-युक्रेन युद्ध लगेच संपेल असा दावा त्यांनी केला. दरम्यान, ट्रंप यांनी काल क्रिप्टोकरन्सी कार्यकारी संघटना स्थापन करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. डिजिटल ऍसेट धोरण, क्रिप्टोविषयक करार, बिटकॉइन गंगाजळी वाढवणं यासाठी क्रिप्टो सल्लागार मंडळ सल्ला देणार आहे.