केंद्रसरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येत असून त्याचं उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्लीत काल पत्रकार परिषदेत चौहान यांनी ही माहिती दिली. ‘जल लाये, धनधान्य’ अशी या यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही यात्रा ६० ते ९० दिवसांत देशभरातल्या ८०५ प्रकल्पांची माहिती देत फिरणार आहे. २६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ६ हजार ६७३ ग्रामपंचायतींना ही यात्रा भेट देईल. ही यात्रा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० चा भाग आहे. जलसंधारण आणि मातीच्या नापिक होण्याबद्दल जनजागृती करणं हा यात्रेचा उद्देश आहे, असं मंत्री चौहान यांनी सांगितलं. या यात्रेत लोकांनी मोठ्या संख्यने सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं.