रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकतील, असं गडकरी म्हणाले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांसंदर्भात विविध सदस्यांनी प्रश्न विचारले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महामार्ग भूसंपादनात शेतकऱ्यांना किरकोळ मोबदला मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. धाराशिव शहर सुरत – चेन्नई महामार्गाला जोडण्यासंदर्भात त्यांनी विचारणा केली. टेंभुर्णी – लातूर मार्गाचं चौपदरीकरणासंदर्भातही त्यांनी विचारणा केली. एका महिन्यात यासंदर्भात निविदा काढली जाईल, असं गडकरी यांनी सांगितलं. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परभणीला राष्ट्रीय किंवा राज्यमार्गाला जोडण्यासाठी विनंती केली. यावर, महाराष्ट्रात ७८ प्रकल्प सुरु असून, लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी अहिल्यानगर – शिर्डी मार्गाच्या दुरावस्थेचा, नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी पिंपळनेर ते सटाणा रस्त्याबाबत, तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देहू – पंढरपूर पालखी मार्गात असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेतल्या जागेबाबत विचारणा केली. हे दोन्ही मार्ग लवकरात लवकर पूर्ण होतील, असं गडकरी यांनी सांगितलं.