आज राष्ट्रीय मतदार दिन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा आहे, अशा शब्दात मोदी यांनी समाज माध्यमांच्या द्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मतदान प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगानं केलेल्या विशेष प्रयत्नांचं देखील मोदी यांनी कौतुक केलं. भारत ही लोकशाहीची जननी असून गेल्या काही दशकांमध्ये देशाची लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशाच्या संविधान निर्मात्यांनी संविधानात नागरिकांच्या सहभागाला महत्व दिलं आहे, असं सांगत प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची एक ध्वनिफीत देखील समाजमाध्यमावर शेअर केली आहे.