हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्वांनी आपापल्या रोजच्या कामातून वेळ काढून किमान एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं .
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता बाळगणाऱ्या आणि क्रीडाक्षेत्रात देशाचं नाव उंचावणाऱ्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.