राष्ट्रीय आरोग्य अभियानाला आणखी पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यावेळी देशातल्या आरोग्य सोयीसुविधांचा आढावा त्यांनी घेतला. गेल्या तीन वर्षांत, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत माता आणि बाल आरोग्य, रोग निर्मूलन आणि आरोग्यसेवा पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
२०२५-२६ च्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमीभावात ६ टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती पीयूष गोयल यांनी यावेळी दिली. तागाला ५ हजार ६५० प्रति क्विंटल इतका हमीभाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा हमीभाव लागवड खर्चापेक्षा ६७ टक्के अधिक असून याचा लाभ ईशान्य भारतातल्या ४० लाख कुटुंबांना होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं.