बांगलादेशाचं ‘आमार शोनार बांग्ला’ हे राष्ट्रगीत बदलण्यात येणार नाही, असं बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं स्पष्ट केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रगीत बदलण्याची मागणी देशातल्या कट्टरतावादी संघटनांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रगीत बदलणार नसल्याचं स्पष्ट करत सरकारनं सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बांगलादेश जमात ए इस्लामीचे माजी अमीर गुलाम आजम यांचे पुत्र अब्दुल्लाहिल अमान आजमी यांनी राष्ट्रगीत बदलण्याची मागणी केली होती. या राष्ट्रगीतात बंगालच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांना एकत्र करण्याबद्दल विचार आहेत. त्यामुळे स्वतंत्र बांगलादेशासाठी हे राष्ट्रगीत योग्य नाही असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. दरम्यान, मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालचं हंगामी सरकार सर्वांच्या सहकार्यानं बांगलादेशाचं निर्माण करू इच्छितं असं सरकारच्या धार्मिक बाबींविषयीचे सल्लागार अबुल फैज मुहम्मद खालिद यांनी सांगितलं आहे. देशात अल्पसंख्यकांवर हल्ले करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Site Admin | September 8, 2024 1:54 PM | Bangladesh