राज्यात विविध सार्वजनिक रुग्णालयांतल्या निवासी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं. मुंबईत मार्डच्यावतीने सकाळी साडेदहा वाजल्यापासून केईएम, नायर, सायन कुपर या रुग्णालयांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी देशभरातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. फोर्डा या निवासी डॉक्टर संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणे मार्फत चौकशी व्हावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी असून, सुमारे साडे तीन हजार निवासी डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
झारखंडमधल्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मधल्या कनिष्ठ डॉक्टरांनीही या घटनेच्या निषेधार्थ बेमुदत संप पुकारला आहे. आपत्कालीन परिस्थिती वगळता आरोग्य सेवेवर परिणाम झाल्यानं रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची आणि कामाच्या ठिकाणी डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी आंदोलकांनी केली आहे.