कांद्याचे दर घसरत असल्यानं शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावमध्ये लिलाव बंद पाडले होते. सकाळी लिलाव सुरू होताच लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमीत कमी ८०० ते जास्तीत जास्त २ हजार ९०० दर मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि लिलाव बंद पाडले. कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, निर्यात शुल्क रद्द करावे अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. आज सकाळी सुमारे अर्धा तास शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर बाजार समितीच्या मध्यस्थीने लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र, भावात फार सुधारणा झाली नाही. गेल्या गुरूवारी लासलगाव बाजार समितीत ३६०० रूपये प्रति क्विंटल असे भाव मिळाले होते.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी अचानक संप केल्यामुळे बाजार समितीत आलेल्या कांदा आणि कृषी माल गाड्यातून खाली करण्यास अडचणी निर्माण झाल्या. गाड्यांमधला माल खाली उतरला नसल्यानं व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव पुकारलाच नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर ठिय्या आंदोलन करुन रोष व्यक्त केला. यावेळी बाजार समितीच्या वरिष्ठांनी मध्यस्थी करुन गुरुवारचा कांदा लिलाव रद्द करुन शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे होईल असे सांगितले. तर शेतकऱ्यांनी शुक्रवारी बाजार समितीत नवा माल आणू नये, असे आवाहन अडत व्यापाऱ्यांनी केले आहे.