नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथं २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अनेक व्यवस्था नव्याने करण्यात येणार असल्याचं जलसंपदा, आपत्तीव्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
कुशावर्ताप्रमाणेच त्र्यंबकेश्वरला नवं कुंड उभारून विविध घाटांचं विस्तारीकरण, स्वच्छता यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. गोदावरीचा प्रवाह अडवणारी सर्व अतिक्रमणे काढून टाकणे, सुविधा निर्मितीसाठी आवश्यक असणारी जमीन संपादित करणे, तसेच गोदावरी नदीचे पुनरुज्जीवन करुन ती कायमस्वरुपी वाहती राहावी, यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल, असं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.