डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 23, 2024 8:56 AM

printer

पोलंडच्या नागरिकांना कोल्हापूरविषयी एवढा जिव्हाळा का ?

दीप बुझे पश्चिमी गगन के, व्याप्त हुआ बर्बर अंधियारा

किंतु चिर कर तम की छाती, चमका हिंदुस्था हमारा..

 

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या या ओळी आहेत. पाच वर्षांपूर्वी पोलंडच्या राजदुतांनी या ओळी भारताला आणि विशेषतः कोल्हापूरकरांना समर्पित केल्या होत्या. कारण ठरलं होतं ती पोलंडच्या प्रतिनिधींची भारत भेट. दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या निर्वासितांना आश्रय देऊन भारतानं जगासमोर मानवतेचं एक श्रेष्ठ उदाहरण सादर केलं. त्याच आठवणींना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यात पुन्हा उजाळा मिळाला आहे. 

 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पोलंड दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल राजधानी वारसॉ इथं कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. कोल्हापूरच्या राजघराण्याप्रति कृतज्ञता म्हणून हे स्मारक उभारण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमून दिलेल्या आदर्शांच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या या घराण्यानं दुसऱ्या महायुद्धात अनेक निर्वासित पोलिश महिला आणि मुलांना आश्रय दिला, त्यांना सन्मानाची वागणूकही दिली. हे मानवतावादी वर्तन पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 

 

जगात पेटलेल्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांची वसाहत म्हणून भारतही अप्रत्यक्षरित्या सहभागी होता. पण, अशा प्रसंगातही भारतानं मानवतेची कास सोडली नाही. या युद्धाची पहिली आणि सगळ्यात मोठी झळ पोलंडला बसली. त्यामुळे पोलंडचे अनेक नागरिक निर्वासित झाले. हा देश आश्रयासाठी जगाकडे पाहत होता, तेव्हा भारतातल्या जामनगर आणि कोल्हापूर या संस्थानांनी त्याची हाक ऐकली. कोल्हापूरच्या छत्रपतींनी पाच हजार निर्वासित पोलिश नागरिकांना कोल्हापुराच्या वळिवडे गावात आश्रय दिला.

 

 

पोलिश नागरिकांसाठी वळिवडे कॅम्प नावाची स्वतंत्र वसाहत स्थापन करण्यात आली. या नागरिकांसाठी रस्ते, पाणी, शाळा, दवाखाने, चित्रपट गृह, ग्रंथालय, दुकानं यांसारख्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. १९४२ ते १९४८ या सहा वर्षांच्या काळात आपल्या जन्मभूमीपासून दूर असलेल्या, वर्णापासून ते भाषेपर्यंत काहीही साम्य नसलेल्या या पोलिश नागरिकांना कोल्हापूरच्या रांगड्या मातीनं आपलंसं केलं. युद्धामुळे मनावर आघात झालेली ती लहान मुलं इथे सुरक्षित वातावरणात रमली. इथल्या शाळांमध्ये शिकली. त्यांनी भारतीय सवंगड्यांबरोबर विविध खेळही आत्मसात केले. युद्धाच्या अस्थिर आणि भयंकर वातावरणापेक्षा वेगळं वातावरण त्यांनी कोल्हापुरात अनुभवलं. हे पोलीश नागरिक जेव्हा भारतात आले होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अनिश्चितता, मनात भीती होती. मात्र, सहा वर्षांनी जेव्हा त्यांना पुन्हा मायदेशी परतावं लागलं, तेव्हा ते कृतज्ञ मनाने आणि भरल्या डोळ्यांनी परतले होते. कारण, भारतानं त्यांना सुरक्षितता आणि सन्मान दिला होता. 

 

 

२०१९मध्ये जेव्हा या कॅम्पमध्ये राहिलेले काही पोलिश नागरिक पुन्हा भारतात आले, तेव्हा त्यांनीही कोल्हापूरकरांचे मनापासून आभार मानले. काही नागरिकांनी इथल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. या सहा वर्षांच्या काळात जे पोलिश नागरिक कोल्हापुरात जन्मले, ते आजही आपली ओळख भारतीय असल्याचं अभिमानानं सांगतात. कोल्हापुरात वास्तव्य केलेल्या ल्युडा या वृद्ध पोलीश महिलेनंही आपल्या बालपणातला सुंदर काळ इथं घालवल्याची आठवण यावेळी जागवली होती. कोल्हापुरातल्या मुली हातात काचेच्या बांगड्या घालतात ते पाहून त्या वेळी अवघ्या नऊ वर्षांच्या ल्युडांनाही बांगड्या घालण्याचा मोह व्हायचा. मात्र, काचेच्या बांगड्या सतत फुटत असल्यानं त्यांच्या आईनं त्यांना ख्रिसमसच्या सणाला धातूची बांगडी घातली होती. ती बांगडी आपण आयुष्यात कधीही काढणार नसल्याचं ल्युडा यांनी सांगितलं होतं. 

 

 

 

भारत आणि पोलंडच्या या मैत्रीच्या वारश्याचा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोलंड दौऱ्यात केला. पोलंडमधल्या मराठी नागरिकांशी मराठी भाषेतून प्रधानमंत्री मोदी यांनी संवाद साधला. महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रति पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वाधिक प्राधान्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हजारो पोलीश महिला आणि मुलांना महाराष्ट्राने आश्रय दिला. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या नागरिकांनी दिवसरात्र एक केली होती, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोलंडमध्ये भारतीय नागरिकांना संबोधित करताना म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा