प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कुवेतला पोहोचले. कुवेतचे प्रथम उप-प्रधानमंत्री शेख फहाद युसुफ सौद अल सबाह यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. गेल्या ४३ वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. या भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे.
मोदी यांच्या स्वागतासाठी कुवेतमधला भारतीय समुदाय उत्साहानं विमानतळावर जमला होता. यावेळी प्रधानमंत्र्यांनी १०१ वर्षांचे माजी परराष्ट्र सेवा अधिकारी मंगल सैन हांडा यांची तसंच रामायण आणि महाभारत महाकाव्याचं अरबी भाषेत भाषांतर करणारे अब्दुल्लाह अल बरौन यांची भेट घेतली.
कुवेतचे अमीर, युवराज आणि कुवेतचे प्रधानमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कुवेतमधल्या बयान राजवाड्यात गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. त्यानंतर अहलान मोदी या कार्यक्रमात ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तसंच अरबी गल्फ कप या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहेत.
भारत आणि कुवेत दरम्यान व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात मजबूत भागीदारी असून, पश्चिम आशियातली शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धीसाठीही दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्याला जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.