ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चपळगांवकर यांचं आज पहाटे निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. साहित्य, कला, राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमं, विधी आणि न्याय, उद्योग, वैद्यकीय, प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांनी चपळगांवकर यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
८० च्या दशकात चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९९९ साली न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रीय राहिले. वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. माजलगाव इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भूषवली.
अभिरुचीयुक्त आणि अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती चपळगांवकर यांनी अनंत भालेराव-काळ आणि कर्तृत्व, स्वामी रामानंद तीर्थ-कर्मयोगी संन्यासी, कहाणी हैदराबाद लढ्याची, कायदा आणि माणूस, विधीमंडळ आणि न्यायसंस्था, मनातली माणसे, संस्थानी माणसे, हरवलेले स्नेहबंध, अशी अनेक पुस्तकं लिहीली. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं, चपळगांवकर यांची समग्र माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळाचं नुकतचं लोकार्पण केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चपळगावकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. चपळगावकर यांच्या निधनानं एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात व्यक्त केली आहे. सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे, त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. एक सिद्धहस्त साहित्यिक आपल्यातून निघून गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हळहळ व्यक्त केली आहे.