डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात नारळी पौर्णिमा उत्साहानं साजरी

राज्यात आज  नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरी होत आहे. कोळी बांधवांसाठी आपल्या मासेमारीचा नवा हंगाम सुरु करण्याचा हा दिवस. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्याची प्रार्थना करुन आणि नारळ अर्पण करुन  होड्या समुद्रात लोटण्याची प्रथा आहे. या निमित्ताने किनापट्टीवरच्या  कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

 

मुंबईतल्या जुहू, वेसावे, खारदांडा, मढ, मालवणी, गोराई, माहुल, वरळी आदी कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त कोळीवाडे सजले असून दारासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. कोळी बांधव सामूहिकपणं पारंपारिक पद्धतीनं मिरवणूकीत वाजत गाजत नारळाच्या पालख्या काढतात. नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीमध्ये नारळ फोडण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

नवी मुंबई मधल्या कोळीवाड्यांमध्येही नारळी पौर्णिमेचा सण  उत्साहाने साजरा झाला.   आज दिवाळे गाव, करावे गाव, सारसोळे गाव , वाशी गाव, सानपाडा, तळवली, दिवागाव, ऐरोली इथल्या कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.  पामबीच मार्गालगत असलेल्या सारसोळे जेट्टी परिसरात  पालखी मिरवणूक काढण्यात आली.  या सणासाठी बोटींना रंगरंगोटी करून पताका लावण्यात आल्या होत्या. समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर कुटुंबासह या बोटीतून समुद्रापर्यंत फेरफटका मारला जातो. 

 

ठाणे, कल्याण, सातपाटी इत्यादी ठिकाणीही समुद्र किंवा खाडीकिनारी नारळी पौर्णिमेनिमित्त जत्रा भरल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा