काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैद्राबादमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी अकरा वाजता नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरपंच, विधानपरिषद, विधानसभेचे सदस्य ते लोकसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. याशिवाय शिक्षण, सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. चव्हाण यांच्या निधनामुळे लोकांच्या आशा आकांक्षांशी समरस झालेलं लोकाभिमुख नेतृत्व हरपलं अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही चव्हाण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेसने लढवय्या कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी गमावला असं खरगे यांनी व्यक्त केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनीही वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.