विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते नाशिकमध्ये आले असता वार्ताहर परीषदेत पटोले यांनी ही माहिती दिली.
राज्यातल्या महायुती सरकारनं कायदा-सुव्यवस्था संपुष्टात आणली आहे, अशी टीका त्यांनी केली. बदलापूर प्रकरणात उच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेऊनही सरकार त्या आंदोलनाला राजकारणाने प्रेरित म्हणते, यातून या सरकारला कोणतीही संवेदना उरली नसल्याचं दिसून येतं. त्यामुळेच उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद हा राजकीय नव्हे, तर जनसामान्यांच्या भावनांचं प्रतीक असल्याचं पटोले म्हणाले.
हे सरकार पदावरून हटवणे हेच आमचे ध्येय असून त्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी हाच चेहरा बनून जनतेच्या समोर जाऊ. नागरिकांनी ‘मविआ’ला सत्ता दिली तर आघाडीतले प्रमुख पक्षनेते मिळून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, इत्यादी नेते उपस्थित होते.