राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर केलं नाही, त्यामुळे तो विफल ठरला, असं त्यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट केली असून सर्वपक्षीय बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे. आता निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची आहे पण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे, असं पटोले म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात भाजपाच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी केलेलं विधान अनुचित असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.