डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

Nagpur Violence : पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

नागपुरातल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.

 

काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं. सर्व समुदायांचे सण-उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशा वेळी सर्वांनीच एकमेकांप्रति आदरभाव राखावा, शांतता राखावी, असं आवाहनही फडणवीसांनी केलं. नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात गवताच्या पेंड्यानीं बनवलेली प्रतीकात्मक कबर जाळली. त्यात जाळलेल्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरल्यानंतर शहराच्या विविध विभागात हिंसाचार झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या प्रकरणी एकंदर पाच गुन्हे दाखल झाले असून नागपुरातल्या ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नागपूरच्या घटनेबाबत विधानसभेत निवेदन दिलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यात सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. त्याची कबर हटवण्यासाठी नागपूरमध्ये आंदोलन झालं, त्याला उत्तर आंदोलनाने द्यायला हवं होतं, मात्र तिथं पूर्वनियोजित कट करून विशिष्ट समुदायांना लक्ष्य केलं गेलं, असा दावाही शिंदे यांनी केला.

 

राज्याच्या गृहखात्याचा कारभार ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यांना आपल्या मूळ गावात उसळलेल्या हिंसाचाराविषयी काहीच माहीत नाही, अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांनी केली आहे.

 

महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन निष्कारण लक्ष वळवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यात हिंसाचार भडकवणं, अस्थिरता निर्माण करणं आणि राज्यातल्या सध्याच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचं काम सरकार करत असल्याची टीका चतुर्वेदी यांनी केली आहे.

 

नागपूर हिंसाचाराचं प्रकरण महाराष्ट्राचं सरकार योग्य रितीने हाताळत असून यात सहभागी असलेल्यांवर सरकार योग्य ती कारवाई करेल, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी या घटनांमागे विरोधकांचं कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.

 

बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी महाराष्ट्रात अशा घटना घडणं योग्य नसून सरकारने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर ती आणखी चिघळेल, अशी टीका आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात केली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा