प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन झालं. नागपुरात माधव नेत्रालय गोळवलकर गुरूजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून नागपुरात आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत, असं यावेळी ते म्हणाले. देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे, आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.
वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे, मेडिकलच्या जागा वाढल्या आहेत, जास्तीत जास्त आणि चांगले डॉक्टर तयार करणं हे सरकारचं ध्येय असल्याचं मोदी म्हणाले. योग आणि आयुर्वेदाला जगात ओळख मिळाली असून यामुळे भारताचा गौरवात भर पडली असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कामाचं कौतुक केलं. ज्याप्रमाणे संतांनी समाजाला नवी ऊर्जा देण्याचं काम केलं तसंच डॉ हेडगेवार आणि गोळवलकर यांनीही समाजाला ऊर्जा दिली. संघ अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करणारी संघटना आहे असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले. पूर, भूकंप किंवा कोणत्याही संकटात मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तत्पर असतात, स्वयंसेवक नेहमीच निस्वार्थीपणे काम करतात, असं प्रधानमंत्री म्हणाले.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या पुस्तकाचं प्रकाशनही केलं.
दृष्टिहीनांना दृष्टी देण्यासारखं मोठ कार्य नाही, हे नेत्रालय केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर संपूर्ण मध्य भारतासाठी उपयोगी संस्था ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतरांसाठी कष्ट करतो, स्वतःसाठी कोणताही अपेक्षा ठेवत नाही असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. संघाचे स्वयंसेवक एक ध्येय ठेवून पुढे वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते.
त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूर मधल्या रेशिमबाग भागातील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांच्या स्मृतीस्थळांना प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जाऊन मोदी यांनी डॉ आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी नागपूर मधल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.