विदर्भातल्या स्थानिक तरुणांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी शंभर एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. नागपूर विद्यापीठ परिसरात काल खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
विदर्भातल्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचं काम या महोत्सवाने केल्याचं फडणवीस म्हणाले.
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीत विविध प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरु होतील, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. विदर्भात कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव नितीन गडकरी यांनी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.