भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारतानं उघडलेल्या ‘ऑपरेशन ब्रम्हा’ मोहिमे अंतर्गत १५ टन मदत साहित्य घेऊन जाणारं पाहिलं विमान आज सकाळी यांगून इथं पोहोचलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. या मदत साहित्यात तंबू, ब्लँकेट, आवश्यक औषधे, ताडपत्री, स्लीपिंग बॅग्ज, जनरेटर सेट, सौर दिवे, स्वयंपाकघर संच आणि अन्न पॅकेट्स याचा समावेश असल्याचं ते म्हणाले. शोध आणि बचाव कर्मचारी आणि उपकरणं असलेली दोन विमानं, ने पि ताव इथं पाठवली जात आहेत. तसंच ८० सदस्यीय एनडीआरएफ शोध आणि बचाव पथक, रवाना होत असल्याचं ते म्हणाले.
बचाव कार्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयानं १२० जणांच्या बचाव पथकासह अत्यावश्यक साहित्य घेऊन दोन विमानं रवाना केली आहेत. चीनचं बचाव पथकही भूकंप शोधक, ड्रोन आणि इतर साहित्यासह,आज सकाळी यांगॉन इथं पोहोचलं. संयुक्त राष्ट्रांनी बचाव कार्यासाठी ५० लाख डॉलर्सची तरतूद केली आहे. म्यानमारमधल्या विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमारचे लष्करी अधिकारी जनरल मिन आंग ल्हाईंग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या आपत्तीमधल्या जीवितहानी बद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. एक जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून, भारत या कठीण काळात म्यानमारच्या जनतेबरोबर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
म्यानमारमध्ये काल झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १ हजाराच्या वर पोहोचला आहे. या भूकंपात २ हजार ३७६ जण जखमी झाले असून ३० जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे.
म्यानमारमध्ये काल ७ पूर्णांक ७ दशांश रिक्टर स्केल आणि त्यानंतर पुन्हा ४ पूर्णांक २ दशांश रिक्टर स्केल असे दोनदा भूकंपाचे धक्के बसले होते. थायलंड मधेही या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राजधानी बँगकॉकमध्ये ६ जण मृत्युमुखी पडले, २६ जण जखमी झाले, तर ४७ जण बेपत्ता आहेत.