मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केली आहे. मुंबई विद्यापिठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावानं ओळखलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. मुंबई विद्यापिठातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाईल, असंही ते म्हणाले. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट, म्हणजे सुरक्षाविषयक उपकरणांचा संच तसंच ‘आयुष्मान कार्ड’चं वितरण आज डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत मुंबईत २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर देशभरात ही योजना प्रभावीपणे राबवणार, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.