मुंबई विद्यापीठात रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन केलं जाणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. नुकताच मुंबई विद्यापीठ आणि रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्यात या संदर्भात एक सामंजस्य करार झाला आहे. या कराराच्या अनुषंगानं रोबोटिक्स सिस्टम, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत एप्लीकेशन्सवर विद्यार्थी आणि संशोधकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रकल्पांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक रोबोटिक प्रणालींसह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असलेला ‘एमटेक इन रोबोटिक्स’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस, कल्याण इथल्या सुमारे ४५ हजार चौरस फुटावर हे सेंटर तयार केलं जाणार आहे.