शेअर बाजारातल्या गेल्या ४ सत्रांमधल्या तेजीला आज आळा बसला. आज सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उंची गाठली होती. मात्र ही तेजी फार काळ टिकू शकली नाही. गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यामुळे बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७३९ अंकांनी घसरला आणि ८० हजार ६०५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २७० अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ५३१ अंकांवर बंद झाला.
धातू, वाहन उद्योग, आर्थिक सेवा आणि ऊर्जा क्षेत्राच्या समभागांनी मोठी घसरण नोंदवली. जागतिक बाजारातली कमकुवत स्थिती आणि अमेरिका आणि चीन दरम्यानचा वाढता व्यापार तणाव आजच्या घसरणीला कारणीभूत ठरल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं.