गणेश मुर्ती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून यासाठी सुमारे १२ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेचे उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली. महापालिकेनं ७१ नियंत्रण कक्ष विविध सुविधांसह उपलब्ध करून दिले आहेत. तसंच विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह २०४ कृत्रिम तलावांची व्यवस्था केल्याचंही त्यांनी सांगितलं. भाविकांच्या सुरक्षेसाठी ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात करण्यात येणार आहेत. तसंच निर्माल्य गोळा करण्यासाठी वाहनं उपलब्ध करून दिली जाणार आहेत, असंही सपकाळे यांनी सांगितलं.
मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे असल्यामुळे अशा माशांपासून सावधान राहण्याचा इशारा महानगरपालिकेने भाविकांना दिला आहे.