टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला राज्य सरकारनं ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली.
आजच्या सत्कारमूर्तींमध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसंच सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा समावेश होता. गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला. देशाला संपूर्ण संघाचा अभिमान असून सर्वोत्तम क्रिकेटपटू घडवण्यासाठी मुंबईत अकादमी सुरू करायला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विश्वविजेत्या भारतीय संघाचं नाव नोंदवलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबईत कालच्या गर्दीचं योग्य नियोजन करणाऱ्या पोलिसांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. मुंबई वानखेडे पेक्षा मोठं मैदान उभ करावं अशी मागणी त्यांनी बीसीसीआय चे खजिनदार आशिष शेलार यांच्याकडे केली.
रोहितनं टी २० मधून निवृत्ती स्वीकारली असली तरी भविष्यात टी २० सामने पाहताना त्याची आठवण येत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
विविध सामन्यात विविध खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यानं हा विजय साकार झाला असल्याचं कर्णधार रोहित शर्मा यानं यावेळी सांगितलं.