मुंबईच्या वातावरण आज धुळीनं व्यापलं होते. काही अंतरावरील वाहने, इमारती पुसट दिसत होत्या. शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं. अशा वातावरणामुळे श्वसनाचा त्रासात वाढ झाली आहे.
पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजनांच्या अंमलबजावणी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेने २४ विभागांत मिस्ट कॅनॉन संयंत्रे, रस्ते पाण्यानं धुवून काढण्यासाठी १०० टँकर, स्प्रिंकलर्स आणि स्थिर फिरत्या अँटी स्मॉग गनचा वापर करून बांधकामातून निर्माण होणारी धूळ आणि रस्त्यावरील धूळ आटोक्यात आणण्यासाठी उपाय केले जात आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर नियमितपणे पाण्याची फवारणी केली जात असल्याची माहिती पालिकेनं दिली.
वायू प्रदूषण नियंत्रणासाठी यापूर्वीच पालिकेनं मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती लागू केली आहेत. बांधकामांशी संबंधित बाबींचा त्यात समावेश आहे. विनापरवाना अथवा बेकायदेशीर राडारोडा वाहतूक करणाऱ्या, आच्छादन न टाकता वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. बांधकाम प्रकल्पस्थळातून बाहेर येणाऱ्या वाहनांची चाके धुवून मगच त्यांना रस्त्यावर आणणं बंधनकारक केलं आहे.