उद्योग, सेवा, कृषी क्षेत्रात पूर्वी आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचं काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. बेरोजगारी हा राज्यासमोरचा सर्वांत गंभीर प्रश्न असल्यानं तरुण बेरोजगारांची व्यथा डोळ्यांसमोर ठेवून मतदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातले उद्योग गुजरातला जाण्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारनं उद्योगपतींचं १५ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांचं कर्ज मात्र त्यांना माफ करता आलं नाही, असं ते म्हणाले.
राज्याची अर्थव्यवस्था घसरण्याला भाजपाच्या नेतृत्वातलं सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. इंडिया आघाडीनं तेलंगण, कर्नाटकात दिलेली आश्वासनं पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन महाराष्ट्रात सत्ता आल्यावर पूर्ण करू, अशी हमी त्यांनी दिली. भाजपा धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडत आहे, असं ते म्हणाले. मुंबई शहरासाठी महाविकास आघाडीने तयार केलेल्या ‘मुंबईनामा’ या जाहीरनाम्याचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.